SMM आयोजित – BMM प्रादेशिक मराठी मैत्री मेळावा 2023
नमस्कार मंडळी, आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की या वर्षी बृहन्महाराष्ट्र मंडळाकडून प्रादेशिक मराठी मैत्री मेळावा आयोजित केला जात आहे
आणि या मैत्री मेळाव्याचे मुख्य यजमानपद सिॲटल् महाराष्ट्र मंडळाला लाभले आहे.
तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल काय आहे हा मैत्री मेळावा? आणि कधी, कुठे असणार आहे?
हा आहे उत्सव आपल्या संस्कृतीचा, आपल्या मायबोलीचा, आपल्या मराठीपणाचा आणि आपल्यातील बंध घट्ट करणाऱ्या मैत्रीचा!
सिॲटल् महाराष्ट्र मंडळ दोन मंडळांबरोबर मिळून हा सोहळा साजरा करणार आहे, या वर्षीच्या मे महिन्यात. आणि ही दोन मित्र मंडळे आहेत – Oregon मधील ओरेगॉन महाराष्ट्र मंडळ (अंजली जोशी – अध्यक्ष) आणि Marathi Society of British Columbia हे Vancouver, Canada मधील मंडळ (पराग सहस्रबुद्धे – अध्यक्ष).
शनिवार 13 मे आणि रविवार 14 मे असा दोन दिवस हा सोहळा असेल.
मैत्री मेळाव्याची संकल्पना असणार आहे – वारसा जपू संस्कृतीचा, बंध जोडू मैत्रीचा!
आपल्या संस्कृतीचं जतन करताना मैत्रीचेही बंध घट्ट जोडू या.
शिवाय आपल्या स्थानिक कलाकारांना कलागुण दाखवण्याची संधी देणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे ही ह्या मैत्री मेळाव्याचे एक उद्दिष्ट आहे.
मैत्री मेळाव्याच्या पहिल्या दिवशी असतील दर्जेदार, सांस्कृतिक कार्यक्रम. ह्यात असेल नाटक, संगीत, वादन, नृत्य आणि बरंच काही. मराठी मनाला भावतील आणि रूचतील अशीच कार्यक्रमांची आखणी असेल. मेळाव्याचा दुसरा दिवस असेल गाठीभेटींचा. उपवर वधू-वरांच्या भेटी ‘रेशीमगाठी’ या उपक्रमाद्वारे होतील. शिवाय मराठी उद्योजकांच्या गाठीभेटी, कवी संमेलन, मराठी शाळेतल्या मुलांचे कार्यक्रम, युवा संमेलन, ज्येष्ठ नागरिकांच्या गप्पाटप्पा, Karaoke असे विविध कार्यक्रम असतील.
मराठी मैत्री मेळावा आणि त्यात खाण्याविषयी उल्लेख नाही! असं कसं होईल?
ह्या दोन दिवसाच्या मेळाव्यात विविध, चविष्ट मराठमोळ्या खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. पट्टीच्या खवय्यांसाठी ही एक पर्वणीच असेल!
गेल्याच वर्षी भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर मैत्री मेळाव्यातील तीन मंडळांच्या पेहरावासाठी आपल्या तिरंग्यातील रंग आम्ही निवडत आहोत- केशरी, पांढरा आणि हिरवा. ह्या तीन रंगातील मराठमोळ्या पेहरावात नटून थटून आलेली मंडळी किती छान दिसतील, हो ना!
स्वागतास रांगोळी, ढोल ताशा पथकांचे सादरीकरण, नाविन्यपूर्ण फोटोंसाठी फोटोबूथ, मराठी संस्कृतीचे प्रतिबिंब दाखवणारी सजावट अशा अजून बऱ्याच गोष्टी असतील. कार्यक्रमाची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला वेळच्यावेळी देऊच.
मैत्री मेळाव्यासाठी आम्हाला प्रायोजक (sponsors) हवे आहेत.
इच्छुकांनी info@seattlemm.org इथे संपर्क साधावा.
मेळाव्यासाठी नावनोंदणीची तारीख निश्चित झाली की आम्ही कळवू आणि तिकिटाची लिंक ही देऊ.
दोन दिवसांची ही आनंदयात्रा आपल्या सर्वांसाठी संस्मरणीय ठरेल अशी खात्री आम्ही नक्की देतो.
ह्या मैत्री मेळाव्यास तुमच्या पाठिंब्याची, शुभेच्छांची आणि आशीर्वादाची गरज आहे.
आनंदाचा प्रत्यय यावा,
तुमचा आमचा सूर जुळावा
संस्कृतीचा सुंदर देखावा,
मौजमजेचा अक्षय ठेवा
सुंदर क्षणांचा असेल पुरावा,
BMM मराठी मैत्री मेळावा
कळावे, लोभ असावा.