शिकूया संस्कारातून भाषा, जपूया भाषेतून संस्कृती…!
नमस्कार,
सिॲटल् महाराष्ट्र मंडळने “मराठी शाळा” हा नवीन उपक्रम २०२२ पासून सुरु केला आहे. हा उपक्रम बृहन महाराष्ट्र मंडळ (नॉर्थ अमेरिका) यांच्या छत्रछायेखाली राबवला जात आहे. या शाळेमार्फत आपल्या पुढील पिढीला मराठी मातृभाषा आणि संस्कृती यांची ओळख करून देत आहोत.
या उपक्रमात मुलांना हसत खेळत मराठी भाषेमधून विचार करण्याची, वाचनाची व लिहिण्याची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आपले मराठी सण एकत्र साजरे करणे, आपले परंपरागत मराठी खेळ खेळणे, स्नेहसंमेलन, क्रीडा संमेलन, सहल अश्या व इतर अनेक गोष्टी राबवल्या जात आहेत.
उद्देश
भारताबाहेर राहूनही मुलांनी आपली मातृभाषा साध्या सोप्या पद्धतीने शिकावी. त्यांना आपले विचार मराठीत मांडता यावे आणि सहजरित्या मराठीत संवाद साधता यावा. मुलांना आपले संस्कार, संस्कृती व इतिहास इत्यादी कळावे आणि आपले सण व त्यामागील शास्त्र समजावे.
उपक्रमाचे स्वरूप
- सिॲटल् मराठी शाळा व संस्कार वर्ग हा सिएटल मराठी मंडळ (SMM) यांचा ब्रुहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका (BMM) द्वारे सुरू केलेला उपक्रम आहे. ही एक ना-नफा शाळा आहे. शाळा केवळ स्वयंसेवक चालवतात.
- शाळा ही ऑनलाईन व वैयक्तिक पद्धतीने सुरु आहे. दर आठवड्यात एक दिवस शाळा ऑनलाईन असते तर महिन्याच्या एका रविवारी शाळा वैयक्तिकरित्या भरावल्या जाते.
- ऑनलाईन शाळेमध्ये मुलांना अभ्यासक्रम शिकवल्या जातो तर वैयक्तिक पद्धतीत मुलांना आपले संस्कार, श्लोक इतिहास सांगणे व खेळ, चित्रकला इत्यादी उपक्रम राबविले जातात.
- अभ्यासक्रम हा भारती विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने भारताबाहेर वास्तव्यास असेलेल्या मुलांसाठी तयार कलेला आहे.